Manipur Violence: व्हायरल व्हिडीओनंतर संतप्त महिलांनी जाळले मुख्य आरोपीचे घर
नवी दिल्ली : मणिपूरमधील व्हिडिओने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येत असून अधिवेशनातही याचे पडसाद उमटले आहे. देशभरात खळबळ माजल्यानंतर आता मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले आहे. तसेच, आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात येत आहे.
मणिपूरमध्ये दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. आरोपींची ओळख समोर येताच संतप्त जमावाने मणिपूरमध्ये मुख्य आरोपीचे घर जाळले. यामध्ये बहुतांश महिलांचा समावेश होता. हुइरेम हेरदास सिंग असे घराला आग लावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला आधीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इतर तीन आरोपींची ओळख समोर आलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ अधिकारी व्हिडिओचे विश्लेषण करत आहेत आणि त्यात उपस्थित असलेल्या लोकांची ओळख पटवत आहेत.
दरम्यान, मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाची बदनामी झाली आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही आणि कायद्याचे एकामागून एक पाऊल टाकले जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, सर्वोच्च न्यायालयानेही सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.