दौलताबाद किल्ल्याच्या नामांतरणाविषयी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांचं मोठं वक्तव्य
सचिन बडे | औरंगाबाद: महाराष्ट्राच्या राजकारणात शहरांच्या, वास्तुंच्या नामांतरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यात राजकीय भुकंप झाल्यानंतर सरकार कोसळण्याआधी महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांच्या नामांतरणाचा निर्णय दिला होता. सत्तापालट झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने हाच निर्णय पुन्हा एकदा घेतला. तर, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दाही चांगलाच गाजला आहे. त्यानंतर आता औरंगाबाद येथील दौलताबाद किल्ल्याच्या नामांतरणाचा उल्लेख पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.
लोढा यांनी केव्हा व कुठे केला उल्लेख?
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने दौलताबाद येथील किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दौलताबादच्या किल्ल्याचे नाव आता देवगिरी किल्ला असे करण्याची घोषणा केली. आता शहराचे नाव, विमानतळाचे नाव बदलण्याचा मुद्दा असताना आता किल्ल्याचे नावही बदलले जाणार आहे.
किल्ल्याचा इतिहास:
यादव राजांची राजधानी असलेला हा किल्ला दौलताबादचा राजा भिल्लमराजा याने बांधला असे इतिहास सांगतो. ११८७ साली त्याचे नामकरण देवगिरी असे केले गेले. पन्नास हजार सैन्याचा पराभव अवघा दोन हजार सैनिकांनी करण्याचा इतिहास इथे अनेकवेळा लिहिला गेला. कमी सैन्यबळावर अधिक सैन्याला पराभुत करण्यामागे या किल्ल्याचा बनावटीचा मोठा वाटा आहे. शत्रू किल्ल्याच्या वरपर्यंत पोहोचूच नये याकरता किल्ल्यामध्ये विशेष प्रयोजन केलेले पाहायला मिळते.
हिंदू मतांसाठी भाजपचा मोर्चा आता किल्ल्यांच्या नामांतरणाकडे?
राज्यातील हिंदुत्त्ववादी पक्षांकडून अधिकाधिक हिंदू मतं मिळवण्यासाठी मुस्लिम नावं असलेल्या शहरांची, वास्तुंची नावं बदलण्याचा प्रयत्न केला जातो. मंगलप्रभात लोढा हे भाजप आमदार व राज्याचे पर्यटनमंत्री आहेत आता त्यांनी दौलताबाद किल्ल्याच्या नामांतरणाविषयी केलेल्या या विधानामुळे किल्ल्यांची नावं बदलून अधिकाधिक हिंदू मतं पदरी पाडून घेण्यासाठीचं भाजपचं हे नवं धोरण असल्याची चर्चा रंगली आहे.