मास्कसक्ती होणार? स्वतः पंतप्रधान मोदींनीच मास्क घालून दिले संकेत
नवी दिल्ली : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सज्ज झाले आहे. बुधवारी, नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदार मास्क घालून संसदेत पोहोचले. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर मास्क सक्ती होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
भारतात ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारांची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात कोरोनाचा वाढता धोका पाहता पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बडे अधिकारीही सहभागी होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या नवीन सब-व्हेरियंट BF.7 ची प्रकरणे सापडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर, राज्यांना एक नोट जारी केली जाण्याची शक्यता आहे. यात त्यांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग भर देण्याची शक्यता आहे. तसेच, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान गर्दी टाळता येईल.
सरकारने आधीच परदेशातून येणाऱ्यांची चाचणी सुरू केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की क्वारंटाइन आणि चाचणीसाठी पायाभूत सुविधा येत्या सात दिवसांत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये BF.7 प्रकाराची दोन प्रकरणे गुजरातमध्ये आणि दोन ओडिशामध्ये नोंदवली गेली आहेत. काल आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर केंद्राने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, मागील 24 तासांत देशात 129 नवीन संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,408 आहे. तेथे एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चीन, यूएसए, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांमध्ये BF.7 प्रकरणांवर सतर्कतेवर असल्याने विविध राज्ये त्यांचे स्वतःचे कोविड प्रोटोकॉल तयार करत आहेत.