ममता बॅनर्जी सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जींना ईडीकडून अटक; सहकाऱ्याच्या घरी मिळाले 20 कोटी
सरकारी शाळांमधील कथित भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुमारे 26 तासांच्या चौकशीनंतर अटक केली. काल त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तपास यंत्रणेला २० कोटी रुपये मिळाले होते. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या दोन मंत्र्यांसह सुमारे डझनभर लोकांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. ईडीचे अधिकारी शुक्रवारी सकाळी पार्थ चॅटर्जी यांच्या घरी पोहोचले आणि एस. एस. सी. घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात त्यांची चौकशी केली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सरकारी अनुदानित शाळांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या भरतीमध्ये कथित मनी लाँड्रिंगची ईडीकडून सध्या चौकशी केली जातेय.
अर्पिता मुखर्जी कोण? त्यांचा TMCशी काय संबंध?
अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी असल्याचं ईडीने सांगितलं आहे. सुवेंदु अधिकारी यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसतंय की अर्पिता मुखर्जी दक्षिण कोलकाता येथील प्रसिद्ध दुर्गापूजेशी त्या संबंधित आहेत. दुर्गा पूजा समितीच्या जाहिरातींमध्येही अर्पिता मुखर्जींचा चेहरा पुढे असल्याचं बोललं जातं. अर्पिता मुखर्जीने काही बंगाली, ओडिया आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. असं मानलं जातं की, अर्पिता आणि पार्थ यांची भेट दुर्गा पूजा समितीच्या माध्यमातूनच झाली होती. मात्र अर्पिता मुखर्जींचा पक्षाशी संबंध आल्याचं TMC ने स्पष्टपणे नाकारलं आहे.