काँग्रेस अध्यक्ष पदी मल्लिकार्जुन खर्गे; थरुर यांचा पराभव
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील खर्गेंच्या रुपात कॉंग्रसला अध्यक्ष मिळाला आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते. त्यापैकी मल्लिकार्जुन खर्गे यांना 7,897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. तर, यातील 416 मते बाद झाली.
काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी १९३९, १९५०, १९७७, १९९७ आणि २००० मध्ये निवडणुका झाल्या आहेत. यानंतर तब्बल 24 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. यात शशी थरुर यांचा पराभव करण्यात मल्लिकार्जुन खर्गे यांना यश आले आहे.
दरम्यान, मतमोजणीदरम्यान शशी थरूर यांच्या टीमने पक्षाच्या मुख्य निवडणूक प्राधिकरणाला पत्र लिहून उत्तर प्रदेशमधील निवडणुकीदरम्यान अनियमितता झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि सर्व मते रद्द करण्याची मागणी केली. थरूर यांच्या प्रचार पथकाने पंजाब आणि तेलंगणामधील निवडणुकांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला होता.