राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार - बाळासाहेब थोरात
आदेश वाकळे, संगमनेर
राज्यात शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असं मला वाटत नाही सुप्रीम कोर्टात देखील याचिका चालू आहे.राज्यात सध्या बदलाचे वारे असून लवकरच हे सरकार कोसळून पुन्हा एकदा राज्यात जनतेचे सरकार महाविकास आघाडी सरकार येईल असा आशावाद माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय.काही नेते आता निळवंडेचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत.खऱ्या अर्थाने निळवंडेचे काम मीच केले आहे त्याचं श्रेय घेण्याचे काम हे नेते करीत आहेत.ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे निळवंडेच्या कामात मध्ये मोलाचे योगदान राहिले आहे.जे नेते संगमनेर मध्ये येऊन आमच्याच कामाचे उदघाटन करून विकासाच्या गप्पा मारतात त्यांनी प्रथम नगर-मनमाड रस्त्याकडे लक्ष द्यावे अशी खोचक टीका माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे थेट नाव न घेता केलीय.
संगमनेरच्या तळेगाव दिघे येथील महाराजा लॉन्स येथे संपन्न झालेला भव्य शेतकरी मेळावा व येथील २५ कोटींच्या विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. भव्य शेतकरी मेळावा व विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ पाटील गोडगे तसेच तळेगाव सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या वतीने करण्यात आले होते. तळेगावकरांच्या वतीने माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे तळेगाव चौकात जंगी स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
याप्रसंगी,डॉ.सुधीर तांबे,माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ,एकविरा फाउंडेशनाच्या अध्यक्षा डाॅ.जयश्रीताई थोरात,जि.प.सदस्य महेंद्र गोडगे, जि.प.सदस्य अजय फटांगरे,उपसभापती नवनाथ अरगडे उपस्थित होते.यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.