काश्मिरी हिंदुंसाठी जे जे शक्य होईल ते करणार - उद्धव ठाकरे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग' सुरू आहे. महिनाभरात अनेक कश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली. शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचं पलायन सुरू झालं आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, कश्मीर खोऱ्यात कश्मिरी पंडितांचं अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीचं स्वप्नं दाखवलं गेलं, मात्र घरवापसी तर दूरच उलट तिथल्या पंडितांना वेचून वेचून मारलं जातंय. या भयानक परिस्थितीत पंडितांचं मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बोलताना सांगितलं की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील. काश्मिरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी भाजला घेरण्यास सुरुवात केली आहे. काश्मिरमधल्या हल्ल्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजवर टीका केली आहे. कलम 370 हटवल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) तीच स्थिती कायम आहे. काश्मिरी पंडितांच्या नशिबात पलायनच आहे. काश्मीर फाईल्स 2 हा चित्रपट काढावा आणि आताच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हे त्यात दाखवण्यात यावे असे राऊत म्हणाले.