महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची महासुनावणी, आज सत्तासंघर्षांबाबत महत्वाचा निर्णय
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणासाठी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडून मंगळवारी निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे यासंदर्भातील याचिकांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
सत्तासंघर्षाप्रकरणी आज एकाचवेळी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात महत्वाचा दिवस आहे. निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर झालेली आहेत. आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण क्रमांक दोनला आहे. सात सदस्यीय घटनापीठाने फेरविचार करावा, अशी मागणी ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीच्या वेळी केली आहे. त्यामुळे या मुद्दय़ाचा फेरविचार सात सदस्यीय घटनापीठाने करणे आवश्यक आहे की नाही, याबाबत पाच सदस्यीय घटनापीठाकडून मंगळवारी निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठविल्या गेलेल्या मुद्दय़ावर निर्णय होईपर्यंत अन्य मुद्दय़ांवर सुनावणी घ्यायची नाही, असा निर्णय मंगळवारी घेतला गेल्यास पाच सदस्यीय घटनापीठापुढील अन्य मुद्दय़ांची सुनावणीही लांबणार आहे.