महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा स्थगित
बेळगाव सीमाभागातील हिरेबागवाडी टोलनाक्यावर काल (6 डिसेंबर) महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या सहा ट्रकची तोडफोड कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे. या प्रकारानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. यावर बसवराज बोम्माई यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून आज सुरु झालेली बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित झाली आहे. कोल्हापूरमधून बेळगाव व निपाणीच्या दिशेने दोन रवाना झाल्या. या बसेस तेथून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. मात्र, त्यानंतर बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटक परिवहनची एकही बस महाराष्ट्रात आलेली नाही.