मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी पूर्ण: मात्र न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा
राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न समोर आहे. ठाकरे की शिंदे यांची. यासोबतच शुक्रवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारी करण्यात आली आहे मात्र शिवसेनेतील फुटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयानंतरच विस्तार केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेले काही दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी रविवापर्यंत विस्तार होईल, असे सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या सुनावणीत निर्णय होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे विस्तार शुक्रवारी करण्याची तयारी राजभवनवर ठेवण्यात आली. त्यासाठी सर्व यंत्रणा गुरुवारी कार्यरत होत्या. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शनिवारी नवी दिल्लीला जाणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत अनिश्चितता कायम असून आज, शुक्रवारी विस्तार होण्याची शक्यता नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने पुन्हा सोमवारी सुनावणी ठेवली असून त्यावेळी अंतरिम आदेश दिला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींकडून विस्ताराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.