अजित पवारांनाच अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

अजित पवारांनाच अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.काही नेत्यांनी विधानसभा सचिवांना पत्र देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला.

कर्नाटकविरोधात आणि सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी ठराव मंजूर करताना विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची परवानगी मागूनही नाकारण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँघ्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी हे पत्र विधानसभा सचिवांना दिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रावर ३९ आमदारांची सही असल्याचंही बोललं जात आहे.

या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला अध्यक्षांविरोधातील या अविश्वास ठरावाबद्दलची काही कल्पना नाही. सध्या तरी अध्यक्ष एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत अशाप्रकारचा अविश्वास ठराव मांडता येत नाही. जर मी सहमती दर्शवली तर त्यावर माझी स्वाक्षरी आवश्यक असेल. मी या प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घालणार आहे” असे ते म्हणाले.

अजित पवारांच्या उत्तरावर “अजित पवारांचं वक्तव्य मी पाहिलं. खरंतर सभागृहात कामकाज पाहताना आधी आपल्या विरोधी पक्षनेत्याला विश्वासात घेऊन सर्व विरोधी सदस्यांनी गोष्टी करायला हव्यात. मात्र, विरोधकांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासार्हता दिसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते म्हणत आहेत की मला त्याबद्दल माहिती नाही, तर हे त्याचंच प्रतीक आहे”, असे म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com