मुस्लीम समाज संविधानाच्या मार्गानं चालणार; भोंग्याच्या वादावर मौलवींची भूमिका
ठाणे | निकेश शार्दुल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. मशिदीवरील भोंगे (Azan Loudspeakers) काढा अन्यथा मशिदींसमोर भोंगे वाजवू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता मुंब्र्यातून एक सकारातक्मक माहिती समोर येत आहे. मुंब्र्यातील (Mumbra) मौलवींनी मुस्लीस समाजातील लोकांना शांततेंचं आवाहन केलं आहे.
इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म आहे. त्यामुळे एखादा मुस्लीम तरुण जर बोलत असेल तर तो सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करीत नाही. तत्कालीक प्रसिद्धीसाठी तो अशी विधाने करीत आहे. त्यांचे हे वाक्य समस्त मुस्लीम धर्मियांसाठी लागू होत नाही. त्यामुळे त्याची आम्ही सर्वांनी निंदा करतो असं म्हणत मौलवींनी व्हायरल झालेल्या एका जुन्या व्हिडिओवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा धर्म शांतता शिकवत असल्याने संविधानिक मार्ग, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणाली आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या पलिकडे आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मुंब्रा येथील सर्व मौलवींनी मांडली.
मुंब्रा येथील मुस्लीम समुदायाने अत्यंत सामोपचाराची भूमिका घेत तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचं ठरविलं आहे. त्याच अनुषंगाने मुंब्र्यातील सर्व मौलानांच्या पुढाकाराने मुंब्रा येथील सुमारे 60 ते 70 मौलवींनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत मुस्लीम समुदायासह सर्वांनाच शांततेचे आवाहन केलं आहे. मुंब्रा हे सामाजिक एकतेचं प्रतिक असलेलं शहर आहे. मुंब्य्रात प्रवेश केल्यानंतर मंदिर आणि मशिद आजूबाजूला असल्याचं चित्र दिसून येतं. येथील हिंदू-मुस्लीम हा भावा-भावाप्रमाणे राहत आहे. आमच्या दृष्टीने धर्माच्या पातळीवर कुराण-ए शरीफ महत्वाचे असले तरी देशाच्या दृष्टीने आम्ही देखील राष्ट्र म्हणून केवळ संविधानालाच सर्वश्रेष्ठ मानत आहोत असं मौलवींनी म्हटलं आहे.
मौलवींनी पुढे असंही सांगितलं की, आमचा धर्म हा शांतता आणि कायद्याचं पालन करण्याची शिकवण देतो. त्यामुळे कोण काय बोलतो किंवा कोणी काय विधान केलं, याच्याशी सामान्य मुस्लीम समाजाला काहीही देणंघेणं नाही. अशा माथेफिरुंच्या विधानाला आम्ही गांभीर्यानं घेत नाही. संविधानिक मार्ग आहे, त्या संविधानाच्या मार्गावरच आम्ही चालणार आहोत. ज्या तरुणांनी माथी भडकवणारी विधानं केली, तो तरुण काही सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठीत नाही. त्यामुळे तत्कालीक प्रसिद्धीसाठी माथेफिरु लोक काहीही करीत असतात. अशा लोकांची निंदा करायलाच हवी. अल्लाहू-अकबर ही घोषणाच मूळात देव हा सर्व शक्तीमान, सर्वश्रेष्ठ आहे, मग, देव हा कोणत्याही धर्माचा असू दे, तोच सर्वशक्तीमान आहे, हे सांगणारी आहे. असे यावेळी या सर्व मौलवींनी सांगितले.