अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
सिंधुदुर्ग : अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांनी साथ देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. परंतु, अजित पवारांना भाजपचा मुख्यमंत्री पदाचा शब्द असल्याची चर्चा आहे. अशातच, ठाकरे गटाच्या नेते वैभव नाईक यांनी मोठे विधान केले आहे. अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.
काय म्हणाले वैभव नाईक?
अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होऊ शकतात. कुठल्याही लोकांना घेऊन भाजपची सत्तेसाठी वाटचाल सुरू आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मंत्रिपदाचे लॉलीपॉप दाखवायचं. असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे बातमींमध्ये तथ्य असू शकते, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या एन्ट्रीने शिंदे गट नाराज झाल्याच्या चर्चा असून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा देत नाहीये. या बातम्या कोण पसरवत आहे हे मला चांगलं माहित आहे. 2024मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. अजितदादा पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडे आहे. आणि सरकारवर माझंच कंट्रोल आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.