...म्हणून मी शिंदे गटात गेलो; उध्दव ठाकरेंसाठी ढसाढसा रडणारे बांगर यांचे स्पष्टीकरण
गजानान वाणी | हिंगोली : शिवसेनेत (Shivsena) फुट पडली असतांना आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांनी भावनिक भाषण केले होते. त्याशिवाय, त्यांनी आपल्या जिल्ह्यात बंडखोरांविरोधात जाहीर भूमिकाही घेतांना त्यांना रडूही कोसळले होते. आता ते शिंदे गटात (Shinde Group) दाखल झाले आहे. बांगर यांनी घेतलेल्या यु-टर्नमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. यावर आता कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी शिंदे गटात गेलो असल्याचे स्पष्टीकरण आमदार संतोष बांगर यांनी दिले आहे.
संतोष बांगर म्हणाले की, ज्या वेळेस बंडखोरीचे नाट्य घडलं त्यावेळी महाराष्ट्रातील मी पहिला आमदार असेल की मला उद्धव साहेबांनी आदेश दिला की तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जा. मी जिल्ह्यात आल्यावर रडलो-भावनिक झालो. पण, मी संपूर्ण शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विचारले. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितले की, साहेब शिवसेनेचा मुख्यमंत्री होत आहे. बाळासाहेबांच्या मनातला मुख्यमंत्री व्हावा म्हणून तुम्ही तुमच एकनाथ शिंदे यांना अमूल्य मत द्याव म्हणून मी सर्व मतदारांच्या कार्यर्त्यांच्या आग्रहास्तव सगळ्याच्या मते निर्णय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे.
सुरक्षा का नाकारली यावर बोलताना ते म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाला सिक्युरिटीची गरज नाही. माझी सिक्युरिटी मी स्वतः आहे. संपूर्ण शिवसैनिक माझी सिक्युरिटी आहे. जो पर्यंत शिवसैनिक संतोष बांगरच्या सोबत आहेत. तोपर्यंत संतोष बांगरच्या केसालाही धक्का लागणार नाही. एवढी ताकद माझ्या शिवसैनिकात आहे, असा विश्वास बांगर यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. संतोष बांगर मातोश्री सोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांचा सत्कार करण्यात येत होता. उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आमदार संतोष बांगर मतदार संघात परतले होते. त्यानंतर कट्टर शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत झाले होते. बंड पुकारलेल्या आमदारांना यावेळी त्यांनी परत येण्याचं आवाहन केलं. हात जोडून त्यांनी आमदारांना परत या असं आवाहन केलं. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते. परंतु, बहुमताच्या एक दिवस आधीच संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता.