हिंमत असेल तर...; शिंदेंचे भाषण सुरु असतानाच उध्दव ठाकरेंचे थेट आव्हान
मुंबई : शिंदे सरकार बहुमत चाचणी विजयी झाले आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभागृहात भाषण सुरु असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे थेट आव्हानच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीला राज्यसभा खासदार अनिल देसाई उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लढायचे असेल तर सोबत राहा, असा सल्ला दिला. तसेच, भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा, असे आवाहन उध्दव ठाकरेंनी केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे काही सुरु आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, रात्री उशिराने शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंना मान्यता मिळाली असून उद्धव ठाकरे नियुक्त अजय चौधरी यांची शिवसेनेच्या गटनेतेपदाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तर, शिवससेनेचे मुख्य पक्षप्रतोदपदी असलेल्या सुनील प्रभू यांचीही नियुक्ती रद्द करण्यात आली होती. यावर आज उध्दव ठाकरेंनी टीका केली.