ठाकरे गटाला दिलासा! पालिकेने स्वीकारला राजीनामा
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर करण्याचा आदेश दिला. यानुसार महापालिकेनी आज लटके यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यामुळे ठाकरे गटाची मोठी अडचण दूर झाली आहे. आज दुपारी १२ च्या आसपास लटके या उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनी राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेने ऋतुजा लटके यांना दिले आहे. यात आपण उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती नितीन जामदार तसेच न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने १३ ऑक्टोबर रोजी पारित केलेल्या आदेशानुसार आपल्या उपरोक्त विषयासंदर्भातील 3 ऑक्टोबर रोजीच्या अर्जाबाबत कळविण्यात येते की, आपला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा राजीनामा आज स्वीकृत करण्यात येत आहे, असा मजकूर स्वीकृत पत्रात लिहीला आहे.
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणी दूर झाल्यानंतर आज त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट व भाजप उमेदवारांसह अन्य काही उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केले आहे. ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यासोबत राकेश अरोरा क्रांतिकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्थान जनता पार्टी, मिलिंद कांबळे (अपक्ष) आणि निना खेडेकर (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं वृत्त माध्यमांनी दिले आहे.