धनुष्यबाण चोरीला गेला; या चोरीसाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीने..., राऊतांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राज्याच्या राजकारणात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. काल निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. आता या निर्णयामुळे ठाकरे गटात आणि शिंदे गटात वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. यावरूनच आरोप- प्रत्यारोप सुरु असताना आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
ठाकरे गटाला सध्या निवडणूक आयोगानं’मशाल’ हे पक्षचिन्ह दिलं आहे. पण हे चिन्ह समता पक्षाचं आहे, त्यामुळे समता पक्षाने या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात आज संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी नवीन निवडणूक चिन्हाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही सगळे फक्त धनुष्यबाण जे चोरणारे लोकं आहेत त्यांच्या तपासाला लागलेलो आहोत. ही चोरी त्यांना महाग पडेल. चोरांना अनेक ठिकाणी रस्त्यात पकडून मारलं जातं. चोर हातात सापडला तर त्यांना रस्त्यावर लोकं कपडे काढून मारतात. धनुष्यबाणाच्या चोरांनासुद्धा अशाप्रकारे राज्याची जनता रसत्यावर पकडून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.
पुढे ते म्हणाले की, मी आता कोकणच्या दौऱ्यावरून परत आलो आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणाची चोरी झाली आहे. हे चोर कोण आहेत? याचा तपास आम्ही घेत आहोत. अलीकडच्या काळात मंदिरावर दरोडे पडतायत, मंदिरांचे सोन्याचे कळस चोरीला जातायत, मूर्तींच्या चोरी होतायत. अगदी याचप्रमाणे आमच्या मंदिरातील शिवसेनाप्रमुखांचे धनुष्यबाण चोरीला गेले आहे. या चोरीसाठी दिल्लीतील एखाद्या महाशक्तीनं काय मदत केली? याचा तपास आम्ही करतोय. पण लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, धनुष्यबाणाची चोरी झाली असून संशयित चोर कोण आहेत? याची माहिती लवकरच जनतेसमोर आणू. अशी टीका त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे केली आहे.