ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार का? उध्दव ठाकरे म्हणाले...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यामुळे ठाकरे गटाच्या प्रचंड अडचणी वाढल्या आहेत. त्यातच दुसरीकडं राज्यात झालेल्या या राजकीय घडामोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु, या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यावरच आता ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे?
शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा निकाल आम्हाला मान्य नाही, हा अन्याय आहे. आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला मान्यता दिली आहे. दोन गट आहेत, हे मान्य केलं आहे. त्यानुसार आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या गटाचा व्हिप आम्हाला लागू होणारच नाही, आम्ही आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आता आमचा आणि त्यांचा संबंध नाही. तसेच, मला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोन केला होता. यांच्याशी माझं बोलण झालं आहे. आता भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. आता लोकचं गद्दारांना धडा शिकवतील. असा इशारा त्यांनी दिला आहे.
व्हीपबद्दल शिंदे गट काय म्हणाला?
शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी याबाबत स्पष्टचं सांगितले की, अधिवेशनातील उपस्थितीबाबत लवकरच व्हीप जारी करणार आहे. हा व्हीप सर्वांना लागू होतो, त्यातून कोणीही सुटणार नाही. शिवसेना नाव आणि चिन्ह यावर जे कोणी निवडून आले आहेत, मग ते ठाकरे असो किंवा शिंदे गट, सर्वांनाच हा व्हीप लागू होणार आहे. आम्ही चुकीचं काही करणार नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.