या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत म्हणून एकत्र आले-अंबादास दानवे
राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना शिंदे- फडणवीस सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून चांगेलच धारेवर धरले आहे. अशातच काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लावलेले मनसेच्या दीपोत्सवातील उपस्थितीवर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना घाबरून हे तिन्ही नेते एकत्र आले असल्याचे असे दानवे यावेळी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले दानवे?
भाजप-शिंदे गट- मनसे महायुतीबाबत बोलताना दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या ताकदीने घाबरून हे तिन्ही एकत्र येतील, पण उद्धव ठाकरे त्यांना पुरून उरतील असा इशारा दानवेंनी यावेळी दिला आहे. त्यामुळे महायुती होण्याआधीच ठाकरे गटाकडून ही प्रतिक्रिया आली आहे.
पुढे ते म्हणाले की, तसेच या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात हेच मला कळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक जण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपण याला गद्दारी म्हणतात असे म्हणत दानवेंनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे. दरम्यान एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही असे बोलत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचे का असा सवाल दानवेंनी यावेळी केला आहे.
महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलयं, कधी नव्हे तशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहिर केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. कृषीमंत्री चुकीचे आश्वासन देतात जे कधी पूर्ण होतच नाहीत. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात सांगितलं होते तेव्हा उपमुख्यमंत्री भडकले होते. कृषिमंत्री असंवेदनशील स्टेटमेंट करत आहेत, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.कृषीमंत्र्यांना भावना आहेत का, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्री करत आहेत. अशी टीका यावेळी बोलतांना दानवेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर केली.