'संजय राऊत हा एक रिकामटेकडा माणूस' गायकवाडांची विखारी टीका
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून शाब्दिक युद्ध पाहायला मिळते. यातच काल मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला होता. त्यात अनेक भाजपचे आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते. या मोर्च्यादरम्यान, मोर्चेकरांनी शिवसेना भवनासमोर घोषणाबाजी केली होती. त्यावर कालच शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी टीका केली होती. याच टीकेला आता शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विखारी टीका केली आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, संजय राऊत हा एक रिकामटेकडा माणूस आहे. त्याच्याकडे कुठलेही काम नाहीये. मराठा समाजाच्या निघालेल्या लाखोंच्या मोर्चाला सुद्धा त्याने मुक्काम मोर्चा म्हणून टिंगल केली होती. सध्या राज्यात आणि देशांमध्ये जे हिंदू जन आक्रोश मोर्चे निघत आहेत, ते गोमातेच्या रक्षणासाठी आहेत. आतंकवाद्यांच्या सांगण्यावरून आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद हैदोस घालतो आहे, लाखो मुलींचे धर्मांतर त्या ठिकाणी केले जातेय. त्याच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा आणण्यासाठी हे मोर्चे निघत आहेत. अनेक राज्यांनी हा कायदा लागू केला आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू करण्यात यावा. हा कायदा आपल्या हिताचा आहे. अशा मोर्चांवर टिंगल टवाळी करणं म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणाऱ्या संजय राऊतांची दिवाळखोरी निघाल्याचे दिसत आहे. अशी टीका गायकवाडांनी केली आहे.
पुढे त्यांनी निवडणुक आयोगाच्या सुनावणीवर बोलताना ते म्हणाले की, ऑन मेरिट खासदार आणि आमदारांची संख्या लक्षात घेता, निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच देईल. कारण निवडणूक आयोगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना हे एक नाव, प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना हे दुसरं नाव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिसरं नाव अशा तीन नावांपैकी ठाकरे गटाला सांगितलं की, तुम्हाला कुठलं नाव चालतं? त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना घेतलं नाही. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव घेतलं, आणि धनुष्यबाण हे जे चिन्ह घेतलं होतं ते बाळासाहेबांनी घेतलं होतं. ती बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला भेटल्यामुळे त्यांना त्या चिन्हावर हक्क सांगायचा अधिकार नाही. म्हणून धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले.