चिन्ह गोठवलंय, पण रक्त पेटवलंय; उध्दव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा
मुंबई : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळातून एकच खळबळ माजली असून नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा त्यांनी पोस्टर शेअर करत ट्विटरवरुन शिंदे गटाला थेट इशाराच दिला आहे.
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच सर्वांना उध्दव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. अखेर उध्दव ठाकरेंनी सोशल मीडियातून व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. याआधीच इन्टाग्रामवर त्यांनी जिंकून दाखवणारच, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सोबत हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो पोस्ट केला होता.
यानंतर आता उध्दव ठाकरेंनी ट्विटरवर दसरा मेळाव्यातील एक पोस्टर शेअर केले आहे. यावर चिन्ह गोठवलंय..., पण रक्त पेटवलंय..., असा मजकूर लिहीला आहे. यावरुन आता त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे इशारा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेला. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, अशी भीती त्यांनी वर्तवली आहे. सोबतच आता असो किंवा नसो पण आता निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी दाखविली पाहिजे. मी देखील वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर लढलोय, असा सल्ला देखील पवारांनी उध्दव ठाकरेंना दिला आहे.