PM Modi | Uddhav Thackeray
PM Modi | Uddhav Thackeray Team Lokshahi

कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान, पण...; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'सामना' अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा
Published on

मुंबई : प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना ‘पद्म’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यातील बरीच नावे ही ‘संघ’ परिवाराशी संबंधित आहेत व त्याविषयी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे टीकास्त्र शिवसेनेने सामना संपादकीयमधून मोदी सरकारवर साधला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

PM Modi | Uddhav Thackeray
कोश्यारींच्या जागी नवीन राज्यपाल कोण? 'ही' नावे आहेत शर्यतीत

कर्नाटकातील ‘वोक्कालिगा’ समाजावर प्रभाव टाकण्यासाठी कृष्णा यांचा गौरव केला गेला, असे सांगितले जाते. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. दिवंगत मुलायमसिंग यादव यांनाही पद्मविभूषण सन्मान देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली हे महत्त्वाचे.

अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. मुलायमसिंग यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्याठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय, असा प्रश्नही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.

बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणाऱ्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र विधानसभेत लावले त्याचा काय मोठा गाजावाजा केला! पण याच सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर यांची शिफारस भारतरत्नसाठी केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, पण महाराष्ट्र व देशात ज्यांना नागरी पुरस्कार मिळाले त्यात बहुसंख्य हे संघ परिवाराशी संबंधित आहेत.

अर्थात, त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे. गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचा कलावंत परशुराम खुणे यांचा सन्मान सुखावणारा आहे, पण मुलायमसिंग यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com