Dhairyasheel Mane : कोल्हापुरात शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष पेटणार? खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा
शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Darisheel Mane) यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटात प्रवेश केला आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर आज (25 जुलै ) शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात आला आहे. धैर्यशील माने यांना जाब विचारण्यासाठी हा शिवसैनिकांचा मोर्चा असणार आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन त्यांच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केले आहे. शिवसैनिकांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याची माझी तयारी असल्याचे खासदार माने यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर कोल्हापुरातील शिवसेनेचे तत्कालिन राज्यमंत्री, आमदार यांच्यापाठोपाठ दोन्ही खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर यांच्यानंतर खासदार संजय मंडलिक व खासदार माने हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. याआधी आबिटकर यांच्या घरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या मेार्चात खासदार मंडलिकही सहभागी झाले होते.
शांततेचे आवाहन
शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्याने आंदोलन करण्याची त्यांची मानसिकता तयार झाली आहे. त्यांचा आक्रोश व संवेदना आपण समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी मोर्चा येणार आहे. त्यांना उत्तर देण्याची आपली तयारी आहे, त्यामुळे समर्थकांनी शांत रहावे असे आवाहन खासदार माने यांनी केले आहे. या मोर्चात सहभागी होणारे सारे आपलेच बंधूभगिनी आहेत, त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे, त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे हे आपले कर्तव्य आहे, आणि ते आपण पार पाडणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे.