'मी पुन्हा येईन'वरुन शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टोलेबाजी; त्या पदाच्या खाली....
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन मी पुन्हा येईनची घोषणा केली आहे. यावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीकेची राळ उठवली आहे. तर, पंतप्रधानांच्या या विधानाचा समाचार शरद पवार यांनीही घेतला आहे. शरद पवारांनी आज धनंजय मुंडेंच्या बालेकिल्ल्यात जाहिर सभा घेत निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
शरद पवार म्हणाले की, दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल सांगितले, माझी त्यांना एकच विनंती आहे, महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्यांचे नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनी सांगितले होते मी पुन्हा येईन आमचं म्हणणं एकच आहे मोदी साहेबांना तुम्ही ही जी घोषणा केली त्यामध्ये देवेंद्र यांचे मार्गदर्शन होते का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
फडणवीसांनी सांगितले होते मी पुन्हा येईन ते पुन्हा आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही खालच्या रॅकवर. आता पंतप्रधान म्हणतायेत की मी पुन्हा येईन ते पुन्हा येणे देवेंद्र यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन यायचं असेल तर त्या पदाच्या खाली कुठे जायचे याचा विचार करून तुम्ही पुढचे पाऊल टाका एवढेच या ठिकाणी सांगतो, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला आहे.
तर, मणिपुरमध्ये समाजा समाजामध्ये भांडण झाली गावागावांमध्ये अंतर पडले, एक वर्ग विरोधात दुसरा वर्ग हल्ले होत आहेत. उद्योग नष्ट केले जात आहेत, स्त्रियांच्या अब्रूची धिंड काढली जाते, आणि हे सर्व होत असताना सुद्धा देशाचे सूत्र असलेले भाजपचे सरकार कोणत्याही प्रकारचे पाऊल टाकत नाही. देशाचा पंतप्रधान इतक्या भगिनींशी त्या ठिकाणी दुर्दशा झाल्यानंतर, घरे दारे पेटवल्यानंतर, समाजातील लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जायची आवश्यकता होती पण तिकडे ढुंकूनही पाहण्याची त्यांना गरज वाटली नाही.
पार्लमेंटचे अधिवेशन सुरू झाले, त्याआधी दोन दिवस आधी तीन मिनिटे फक्त ते मणिपूरवर बोलले आणि अविश्वासाचा ठराव आल्यानंतर आणखी चार पाच मिनिटे बोलले पण त्या भगिनींचे दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही, अशी टीका शरद पवारांनी सांगितले आहे.