शिंदेंच्या जाहिरातीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ...त्याबद्दल त्यांचे धन्यवाद
अमळनेर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना शरद पवारांनी मात्र आभार मानले आहे. तसेच, शिंदे-फडणवीसांनी त्यांनी जोरदार टोलाही लगावला आहे. अमळनेर येथे पक्ष शिबीरानिमित्त उपस्थित असताना स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, दुर्दैवाने आमचा समज होता की राज्यात बनलेल्या सरकारमध्ये मोठा वाटा हा भाजपचा आहे. पण झालेल्या जाहिरातबाजीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. यामध्ये भाजपचे योगदान जास्त नसून अन्य घटकांचे योगदान आहे हे महाराष्ट्राला कळवण्याचे ऐतिहासिक काम जाहिरातीच्या माध्यमातून झाले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला आहे. या जाहिराती देण्याचे काम ज्यांनी केले त्यांनी प्रिंट मीडियाच्या दृष्टीने लाभदायक गोष्ट केली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
लहान मुलांचे वय हे संस्कारक्षम वय असते. या वयात त्यांच्या मनावर योग्य परिणाम होईल असे विधान करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये सामाजिक ऐक्याला धक्का बसेल असे काही शैक्षणिक अभ्यासक्रमात आले तर ते योग्य नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात काही निर्णय जाहीर केले होते. काँग्रेसला लोकांनी बहुमत दिले. याचा अर्थ काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लोकांची मान्यता आहे. ज्याला मान्यता आहे तो कार्यक्रम राबवणे ही त्या सरकारची जबाबदारी असते. त्याची सुरुवात करण्याची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. त्याप्रमाणे पावले टाकणे जरुरी आहे. त्यासाठी यंणत्रा पाहिजे. सध्याचे सत्ताधारी मोठमोठी आश्वासने देऊन त्यातील काही करत नाहीत. ज्यामध्ये बेरोजगारी, शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न यासारखे असे अनेक विषय आहेत. या सर्व गोष्टी बदलण्यासाठी परिवर्तन हाच पर्याय आहे, असेही शरद पवारांनी म्हणाले आहेत.