...म्हणून मी राजीनाम्याचा निर्णय माझ्या मनाने घेतला; शरद पवारांनी अखेर सांगितले कारण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. यावर शरद पवारांनी निर्णय घेण्याबद्दल खुलासा केला आहे. मी वरिष्ठांना व माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. असं मला आता जाणवत आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली,
मी वरिष्ठांना व माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. असं मला आता जाणवत आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
१ मे १९६० रोजी मी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं १ मे शी वेगळं नातं आहे. मी युवक कॉंग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. ग्रामीण भागातील युवक व युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला होता. तर, जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. छगन भुजबळांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या निर्णयावर विरोध केला आहे. अनेक कार्यकर्त्यांकडून त्यासाठी आंदोलनही केलं जात आहे. कार्यकर्त्यांचा आग्रहाखातर शरद पवार यांनी दोन दिवसांचा कालावधी मागितला आहे. परंतु, 6 मे ऐवजी 5 मे रोजीच राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार असून नवा अध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे.