...म्हणूनच फडणवीस 'मी पुन्हा येईल' असे म्हणतायंत : शरद पवार
अभिराज उबाळे | पंढरपूर : 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालयाचा निर्णय येणार आहे. मात्र तो काय आहे हे मी सांगू शकत नाही. बहुतेक तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणतं असतील, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात सर्वात जास्त राज्यांमध्ये बिगर भाजप पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकात देखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षाची एकजूट करून भाजप समोर सक्षम पर्याय दिला जाईल. कर्नाटकात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. मात्र, यावेळी फडणवीस तेथे विरोधात प्रचाराला गेले आहेत, असे शरद पवारांनी म्हंटले आहे.
सरकारच्या प्रकल्पाचे स्वागत व्हावे. मात्र, स्थानिकांना विचारात घेऊन असे प्रकल्प उभे राहावेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बारसूचा रिफायनरीला विरोध असल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. सरकारने पोलीस बळाचा वापर करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. राजीनामा नाट्य नंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल झाल्याची टीका भाजपकडून होत होती. मात्र, आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार आहे, असे पवारांनी जाहीर केले. शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यात असंतोष आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला आता बदल पाहिजे असे दिसते, असेही त्यांनी म्हंटले आहे.