राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी, अजित पवार-शरद पवार येणार एकाच मंचावर?
मुंबई : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बंड झाले असून अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांना समर्थन दिले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याविरोधात शरद पवार आक्रमक झाले असून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. अशातच, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार आता एकाच मंचावर येणार आहेत. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळा 1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे ४१ वे वर्ष असून देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
टिळक स्मारक ट्रस्टकडून मोदींना पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा रोहित टिळक यांनी केली आहे. या पुरस्कार सोहळ्याला शरद पवार यांना निमंत्रित केले आहे. यासोबतच या सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह बंड करत सरकारमध्ये सामील झाले. याशिवाय अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरही दावा केला आहे. या पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार आमने-सामने येणार असल्याने सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे.