फडणवीसांच्या 'त्या' आरोपांवरुन मविआची चौकशी व्हायला हवी; शंभूराज देसाईंची मागणी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला अटक करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी भाष्य केले. ही गंभीर बाब अशून याची चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी म्हंटले आहे.
जर असे घडले असेल तर हे खूप गंभीर आहे. याची चौकशी लागली पाहिजे. सत्तेचा दुरुपयोग आम्ही करतो, असे आरोप आमच्यावर करता. परंतु, सत्तेचा तुम्ही कसा दुरूपयोग केला याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका शंभूराज देसाईंनी शिवसेनेवर केली आहे.
तर, आज वंचित आघाडीबद्दल महाविकास आघाडीची बैठक आहे. याचा परिणाम आमच्यावर होणार नाही. आमच्याबरोबरही आठवले व कवाडे आहेत. आम्हाला काही फरक पडत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, 40 दगड तलावाच्या गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं. यावरही शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या टीकेला आम्ही विकासकामे करून उत्तर देऊ. तर काही महिन्यांपूर्वी असेच काही तरी राऊत बोलत होते आणि नंतर त्यांनी तीन महिने आराम केला. पुन्हा ती वेळ आली, असे वाटते. पुन्हा आराम करायची वेळ आलीय. हे चक्र चालूच ठेवले पाहिजे अस वाटतंय, असे मोठे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले आहे.