Santosh Bangar : ...तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही
गजानन वाणी | मुंबई : जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम शिवसैनिकांनी करावं, असे हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हंटले आहे. हिंगोलीत शिंदे गटाच्या (Shinde Group) बैठकीत संतोष बांगर बोलत होते.
संतोष बांगर म्हणाले की, जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाही आहोत आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्हाला कोणी आरे म्हटलं तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला दिला आहे.
हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी बैठकीचा आयोजन केले होते. यावेळी ८ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावण सोमवारी हिंगोली जिल्ह्यात कावड यात्रा असते. या कावड यात्रेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याची माहिती आता सुरू असलेल्या बैठकीत संतोष बांगर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणही दिल्याची माहिती बांगर यांनी दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले होते. यावेळी बांगर यांनी मोठे शक्तीप्रदर्शही केले होते. या पार्श्वभूमीवर बांगर मंत्रीपदासाठी फिल्डींग लावत असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यामुळे मंत्रिमंडळात संतोष बांगर यांची वर्णी लागणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.