शिवसेना बॅकफूटवर, शिंदेगटाकडून जोरदार बॅटींग : राऊतांचा प्रस्ताव फेटाळणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता काय तर पक्षही जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिंदे गटात 42 आमदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना बॅकफूटवर आली. शिवसेना नेता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली. परंतु आधी बंडखोरांनी मुंबईत यावे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यांशी चर्चा करावी, अशी अट ठेवली आहे. तर शिंदे गटातील आमदारांनी आधी बाहेर पडा मग विचार करु, असा संदेश पाठवला आहे. त्यामुळे मातोश्रीवर घडणाऱ्या घडामोडींवर अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय.
गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं ताणून विषयात शिवसेना आता बॅकफूटवर आली आहे. अनैसर्गिक आघाडी नको, हे एकनाथ शिंदेंचं म्हणणं मान्य करुन शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. परंतु त्यासाठी आमदारांनी आता मुंबईत यावं आणि चर्चा करावी. पुढील 24 तासात आमदारांनी मुंबईत यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. परंतु शिंदे गट राऊतांचा हा प्रस्ताव फेटळणार असल्याचे वृत्त आहे. आधी बाहेर पडा मग पाहू...असे संदेश पाठवण्यात येणार आहे.
सत्ता अन् पक्ष टिकवण्यासाठी तडजोड
शिवसेना पक्ष आणि राज्यातली सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड सुरु केली आहे. त्यामुळे आता शेवटचे अस्त्र म्हणून दोन पावले माघार घेत पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आहे. परंतु या सर्व घडामोडीत संजय राऊत यांच्यांशिवाय शिवसेनेचे इतर नेते गप्प आहेत. संजय राऊत यांनी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा वर्षा बंगल्यावर येतील, असे वक्तव्य केले आहे. यामुळे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे.