हक्कभंगच्या नोटिसीला राऊतांनी दिले उत्तर; केली 'ही' मागणी
मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन राऊतांवर राजकीय वर्तुळात टीका करण्यात येत होती. या विधानावर आक्षेप घेत विधीमंडळात संजय राऊतांवर हक्कभंग आणण्यात आले आहे. या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत आज संपली. यानंतर संजय राऊतांनी विधीमंडळाच्या हक्कभंग समितीला एक पत्राद्वारे उत्तर दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
काय आहे पत्रात?
मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो व कर्नाटकच्या सीमेवरील भागात असल्याने मुंबईशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिलेल्या मुदतीत खुलासा करणे शक्य झाले नाही. तरी कृपया सविस्तर खुलासा करण्यासाठी आणखी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासून पाहावे, असे संजय राऊतांनी पत्रात म्हंटले आहे.
दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी विधीमंडळ हे चोरमंडळ आहे असं विधान केले होते. सोबतच शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र डागले होते. ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. त्यांनी पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार आहे का? आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक पदे दिली आहेत. आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.