अजित पवारांनी फटकारले; राऊत म्हणाले, माझ्यावर टीका...
मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.
अजित दादा मविआचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांवर आज पूर्णविराम मिळालेला आहे. सत्तेतील लोकं महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मविआला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
तर, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षांबद्दल सांगा. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत, असे अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले होते. याबाबत राऊतांना विचारले असता माझ्यावर टिका केली असेल किंवा नाही मला माहिती नाही. जी बदनामी सुरु झाली होती ती बरोबर नाही आहे, असे म्हणत त्यांनी विषय टाळला.
तसेच, जी भूमिका शिवसेनेवेळी घेतलेली तीच भूमिका राष्ट्रवादीवेळी घेतली. खोट्या आरोपांखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. ईडी, सीबीआयचा वापर करत पक्ष फोडले जातायत यात लपवण्यासारखं काहीच नाही. आम्ही मविआची बाजू मांडतोय, आम्ही चौकीदार आहोत, त्यात चुकीचं काय? अजितदादा पळपूटे नाही, त्यांनी स्पष्ट केलंय. पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सगळे खंबीर उभे आहेत, असेदेखील राऊतांनी म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात लवकरच ऑपरेशन कमळ होऊ शकतं, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. यावर संजय राऊतांनी राज्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यतेवर संजय राऊतांनी सध्या कमळाचा सीझन नाही आहे. बाजारात मी कमळ बघितलं नाही. ऑपरेशन मशाल, घड्याळ किंवा हात देखील होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.