सूडाची तलवार चालवण्यासाठी दिल्लीने पुन्हा एकदा मराठी माणसाचाच केला वापर; राऊतांचे टीकास्त्र
मुंबई : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण देण्याचा निर्णय घेतला. यावर ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठवली आहे. ठाकऱ्यांची शिवसेना एका झटक्यात शिंद्यांची झाली. निवडणूक आयोगाने फक्त 40 आमदारांची ‘मते’ मोजून शिवसेना आणि धनुष्यबाणाचा सौदा केला. इतिहासात असे कधीच घडले नव्हते. लोकशाहीचा खून झाला असे नेहमीच म्हटले जाते, पण खून कसा करतात ते शिवसेनेच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने दाखवून दिले, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून टीका केली आहे.
शिवसेनेचा पसारा आणि ओझे डोक्यावर घेऊन श्रीमान शिंदे किती तग धरणार? शिवसेना म्हणजे ‘ठाकरे’ हे समीकरण गेल्या पन्नास वर्षांपासून आहे. ते जगाला समजले, पण फक्त निवडणूक आयोगाला समजले नाही. निवडणूक आयोगाने डोळे मिटून शिवसेना हे नाव, चिन्ह, धनुष्यबाण हे फुटीर शिंदे गटास दिले. तरीही त्यांना कोणी ‘शिवसेना’ मानायला तयार नाही व निवडणूक आयोगाच्या निर्णयाची सर्वच स्तरांवर चेष्टा उडवली जात आहे.
हिंदुस्थानातील सर्वच ‘स्वायत्त’ संस्था आणि यंत्रणांचे ज्या वेगाने अधःपतन सुरू आहे ते पाहता देश अराजकाच्या वणव्यात ढकलला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर दाद मागण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. खरी शिवसेना आमचीच हे सर्वोच्च न्यायालयात ‘ठाकरे’ यांना सिद्ध करावे लागते हे महाराष्ट्राचे व न्याय व्यवस्थेचे दुर्दैव, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.
निवडणूक आयोगाने आपला स्वतंत्र बाणा राखला नाही व आपलेच पूर्वसुरी शेषन यांचा आदर्श ठेवला नाही. शिवसेना विकण्याचा व विकत घेण्याचा निर्णय दिल्लीने आधीच घेतला. त्या सौद्यात आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. इतके होऊनही शिंदे यांच्या सेनेस कोणी शिवसेना मानायला तयार नाही. पत्रकार निखिल वागळे यांनी यावर टोला मारला आहे. ते म्हणतात, ‘‘आम्हाला शिवसेना म्हणा, असं पत्र शिंदे सेनेने माध्यमांना पाठवलंय. कसं म्हणणार? तुम्ही खरी शिवसेना कुठे आहात?’’
गृहमंत्री अमित शहा व त्यांचे बॉस नरेंद्र मोदी यांच्या सुडाच्या व बदल्याच्या राजकारणातून शिवसेनेवर इतिहासातील भयंकर हल्ला झाला. शिवसेना एका द्वेषातून व सूडभावनेतून पह्डण्यात आली. महाराष्ट्रावर, मराठी माणसांवर सूडाची तलवार चालवण्यासाठी दिल्लीने पुन्हा एकदा मराठी माणसाचाच वापर केला. शिंदे व त्यांच्या लोकांनी केलेल्या बेइमानीची नोंद इतिहासात काळय़ाकुट्ट शाईने केली जाईल. जे गेल्या 50-55 वर्षांत काँग्रेसला जमले नाही, गुंड टोळय़ांना, पाकिस्तानला जमले नाही ते शिंदे यांच्यासारख्यांना हाताशी धरून मोदी-शहांनी केले. पण, मराठी माणूस मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्वाभिमान, अस्मितेच्या युद्धाला तोंड फुटेल! तोपर्यंत जागते रहो, असे देखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे.