आत्महत्या नको, आता हत्या करायला शिक; सदाभाऊ खोत यांचा विद्यार्थ्यांना धक्कादायक सल्ला
पुणे : पुण्यात आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबतच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोतही सहभागी झाले आहेत. यावेळी आत्महत्या नको आता हत्या करायला शिक, असा धक्कादायक सल्ला सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे साष्टांग दंडवत आंदोलन सुरु आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना कवितेद्वारे प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
काय आहे कविता?
शिक बाबा लढायला शिक
कुणाब्याच्या पोरा आता लढायला शिक
मागे मागे नको पुढे सरायला शिक
आत्महत्या नको आता हत्या करायला शिक
लाजरे-बुजरेपणा बाजारात विक
घेऊ नको फाशी आता लढायला शिक
लाखामध्ये कर्ज घेती दलालांची पोर
उडवती कर्ज त्याचे करतील ना
घेतलेलं कर्ज आता बुडवायला शिक
असे अजब सल्ले सदाभाऊ खोतांनी कवितेतून दिले आहे. या कवितेमुळे वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दरम्यान, याबाबत कॅबिनेट मीटिंगमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचा आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे. परंतु, जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.