ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आज भरणार उमेदवारी अर्ज, मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट ) या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापलिका प्रशासनावर राजीनामा मंजूर करण्याचा आदेश दिल्याने ठाकरे गटाची मोठी अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणी दूर झाल्यानंतर आज त्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवारही आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. आज अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील होण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आणखी कोण आहेत उमेदवार?
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट व भाजप असा संघर्ष असताना भाजप आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांसह अन्य काही उमेदवारांनी सुद्धा अर्ज दाखल केले आहे. ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्याआधी कुणी कुणी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरले, त्यांची नावं समोर आली आहेत. राकेश अरोरा )क्रांतिकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्थान जनता पार्टी), मिलिंद कांबळे (अपक्ष) आणि निना खेडेकर (अपक्ष) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.