गुवाहाटीमध्ये जाऊन बच्चू कडूंनी कोटींचा व्यवहार केला; रवी राणांचा आरोप
सूरज दहाट | अमरावती : शिंदे-फडणवीस सरकार राज्यात असले तरी त्यांच्यात कुरबुरी असल्याची चर्चा सध्या सुरु होत्या. परंतु, आता शिंदे व भाजप गटातही वाद समोर येत आहेत. आतापर्यंत केवळ विरोधकांकडून बंडखोरांवर पन्नास खोक्यांचे आरोप लावण्यात येत होते. मात्र, आता थेट भाजप समर्थित आमदार रवी राणा यांनी शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यावर खोक्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बच्चू कडू व रवी राणा यांच्यामध्ये चांगलेच शीत युद्ध पेटल आहे. काल अमरावतीत बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा व नवनीत राणा या दाम्पत्यावर किराणा वाटपावरून टीका केली होती. याला आज आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, बच्चू कडू हे फर्स्ट्रेशनमध्ये गेले आहेत. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला. गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी कोटींचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप रवी राणा यांनी केला. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
तर तुम्ही सुद्धा एक किलो साखर वाटून गरिबांची दिवाळी साजरी करा. बच्चू कडू ही नौटंकी छाप आहे. मी गरिबी भोगली आहे. गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो, असे प्रत्युत्तर रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिले आहे.
दरम्यान, अमरावतीत दिवाळीनिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहे. यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं नाव न घेता टीका केली होती. खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाही आहेत. तसेच महाठग आणि महाऔलाद कमी आहे का? इथून खिसे कापायचे, गोरगरिबांच्या खिशात हात घालायच, लोकशाहीचे पतन करायचं व राजकारणाची ऐसी की तैशी करायची, अशी बोचरी टीका त्यांनी राणा दाम्पत्यावर केली होती.