इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल, खलिस्तान समर्थकाने दिली उघड धमकी
नवी दिल्ली : पंजाबमधील 'वारीस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपालचा सहकारी लवप्रीत तुफान याच्या अटकेच्या निषेधार्थ त्याच्या समर्थकांनी अजनाळा पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. यानंतर अमृतपाल सिंग यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली आहे. इंदिरा गांधींप्रमाणे अमित शहांनाही किंमत मोजावी लागेल, अशा शब्दात अमृतपाल सिंग यांनी खुली धमकी दिली आहे.
अमृतपाल सिंग म्हणाले की, अमित शाह यांनी खलिस्तान चळवळ पुढे जाऊ देणार नाही, असे सांगितले होते. इंदिरा गांधींनीही असेच केले होते. तुम्हीही असेच केले तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हिंदु राष्ट्राची मागणी करणार्यांसाठी गृहमंत्र्यांनी असेच म्हटले तर ते गृहमंत्रीपदावर राहू शकतात की नाही ते मी बघेन.
जेव्हा लोक हिंदु राष्ट्राची मागणी करू शकतात तर आम्ही खलिस्तानची मागणी का करू शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तानला विरोध करण्याची किंमत मोजली. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, मग ते पंतप्रधान मोदी असोत, अमित शहा असोत किंवा भगवंत मान असोत, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच खलिस्तान समर्थकांबाबत आपली भूमिका मांडली आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर सरकार लक्ष ठेवून आहे, असे ते म्हणाले होते.
कोण आहे अमृतपाल सिंग?
अमृतपाल सिंग हा खलिस्तानी समर्थक मानला जातो. अमृतपाल यांना सप्टेंबरमध्ये 'वारीस पंजाब दे' संस्थेचे प्रमुख बनवण्यात आले आहे. 'वारीस पंजाब दे' ही संघटना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूने स्थापन केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता. पंजाबचे शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येप्रकरणी अमृतपाल सिंगचे नावही पुढे आले होते. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंग यांना मोगाच्या सिंगवाला गावात नजरकैदेत ठेवले होते.