शिंदेंच्या शपथविधीवरुन राजकारण पेटलं; राज्यपालांची भूमिका का बदलली?
मुंबई : एकनाथ शिंदे आज नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी शपथविधी दरम्यान सुरुवातीलाच शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले. व मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रश्नचिन्ह उभे करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंना स्मरून घेतली. राज्यपालांनी त्यांना अडवले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात शपथेआधी नेत्यांची नावे घेतली होती. म्हणून मंत्र्यांना पुन्हा शापथ घ्यावी लावली होती. आता राज्यपालांची भूमिका बदलली का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, 2019 साली उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व मंत्र्यांना गोपनियतेची शपथ देत होते. यावेळी शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चिडल्याचे पाहायला मिळाले होते. शपथविधीत नेत्यांची नावे घेतल्याने राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना बोलावून दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. ठरवून दिलेल्या मजकूराव्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही, असेही कोश्यारी यांनी ठणकावून सांगितले होते.