शिंदे-फडणवीस यांची शपथ असंवैधानिक : राष्ट्रवादी
मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते, अशी पुष्टीच राजभवनकडून नुकत्याच दिलेल्या माहिती अधिकारात समोर आली असून राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना पदाची शपथ कशी दिली? ही शपथच असंविधानिक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
एकीकडे सत्तासंघर्षाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक खुलासा माहिती अधिकारात राजभवनकडून सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकवेळा विविध वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने विधानपरिषदेसाठी दिलेल्या १२ उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली नाही याकडेही महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.
माहिती अधिकारात झालेल्या या नव्या खुलाशामुळे आता नवे प्रश्न निर्माण झाले असून आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.