ईडीचं पथक रविवारी सकाळी सात वाजल्यापासून संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. त्यानंतर संजय राऊत यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. दुपारी चार वाजण्याच्या आसपास त्यांना ईडीने ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी संजय राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या घरातून जप्त करण्यात आली. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.
याबरोबरच व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आलं. यानंतर आज संजय राऊत यांची वैद्यकीय तपासणी जेजे हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. तत्पुर्वी संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. यामुळे कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार हे ईडीची दहशत दाखवत असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकार व ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.