कुणी आमदार नाराज असेल तर यादी द्या; का म्हणाले गुलाबराव पाटील?
जळगाव : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटप आज अखेर जाहिर झाले आहे. यानुसार अजित पवारांकडे पुन्हा एकदा तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत. परंतु, अजित पवारांकडे अर्थमंत्रिपद गेल्याने शिंदे गट नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणीही आमदार नाराज नाही कुणी आमदार नाराज असतील त्याची यादी असेल तर मला द्या, असे त्यांनी म्हंटले आहे.
खाते वाटपावर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, तिसरा पार्टनर आल्यामुळे एकमेकांची खाते एकमेकांकडे जाणं हे अपेक्षित होतं. त्यामुळे भाजप शिवसेनेचे खाते राष्ट्रवादीकडे जाणार हे सर्वांनीच मानलं होतं, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.
अजित पवारांकडे अर्थ खातं गेलं त्यात गैर नसून सर्व पक्षांना सारखा निधी मिळाल्यास कुठलीही अडचण येणार नाही, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. कोणी आमदार नाराज नाही कुणी आमदार नाराज असतील तर त्यांची यादी मला द्या, असे म्हणत नाराजीबाबत बोलणे त्यांनी टाळले आहे.
तर, खाते बदलात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील दोन खाते गेली आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खातं जरी गेले असलं तरी दोन चांगले खाते त्यांच्याकडे आले.
दरम्यान, अजित पवार गटाच्या शपथविधीनंतर खातेवाटपाच्या हालाचाली सुरु झाल्या होत्या. यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. अजित पवार वजनदार खात्यांसाठी आणि अर्थमंत्री पदासाठी आग्रही होते. परंतु, अर्थ खाते अजित पवारांना देण्यास शिंदे गटातील नेत्यांचा विरोध होता. अखेर ही नाराजी दुर करण्यास एकनाथ शिंदे यांना यश आले असून अजित पवार अर्थमंत्री पदी विराजमान झाले आहेत.