GulabRao Patil : मुख्यंमंत्र्यांनी वर्षा सोडला, आपले ५२ आमदारांना सोडलं, पण पवारांना सोडायला तयार नाहीत
मुंबई : एकनाथ शिंदे गटांतील बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त केला आहे. तर, गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला. गुलाबराव पाटलांचा हा व्हिडीओ आता जारी करण्यात आला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, येथे आपण कसे आलो आहोत. हे सर्वांना माहित आहे. मतदारसंघात आपल्यावर अनेक आरोप होत आहेत. ते होत असतानाही आपल्या मागे अनेक लोक उभे राहत आहे. हे दोन्ही प्रवाह सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण येथे आलो आहेत. आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. प्रेत काढू तुमचे बाप किती, आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहित नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपण पदापर्यंत पोहोचलो आहेत. 1992 च्या दंगलीची गोष्ट जर संजय राऊतांना सांगितली तर आमचे वडील आणि तिघे भाऊ जेलमध्ये होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते माहित नाही. 56 ब आणि 302 काय असते हे संजय राऊतांना माहित नाही. आम्ही सगळ्यांनी ते भोगले आहे. दंगलीच्या वेळ पायी चालणे काय असते, तडीपार होणे काय असते हे त्यांना माहित नाही.
हे केवळ बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आणि आपण सर्व बाळाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. यामुळे 80 टक्के जरी संघटनेचा सहभाग असला तरी 20 टक्के स्वतःचा सहभाग आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांनी 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये 35 लग्न लावून दाखवावे मी त्यांना बहाद्दर म्हणून समजेल. ज्यावेळी कोणाला रक्ताची गरज असते, रुग्णवाहिकेची गरज असते. कार्यकर्त्याचं लग्न असेल, दु:ख असेल, मरण असेल सगळीकडे आम्ही असतो. कार्यकर्त्यांमध्ये हा विश्वास आहे की आम्ही शिवसेना सोडणार नाही, असेही पाटलांनी म्हंटले आहे.
तर, ज्यावेळेस मैदान येईल तेव्हा सभागृहामध्ये आपण जे ३९ आणि आपले १२-१४ अपक्ष मंडळी आहेत. तेवढे पुरेसे आहेत त्यांना चर्चेमध्ये पराभूत करण्यासाठी. त्यांनी वर्षा सोडला, आपल्यासारख्या ५२ आमदारांना सोडलं. पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असून त्यात 30 जून रोजी बहुमत चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे, संध्याकाळी 5 वाजता त्यावर सुनावणी होणार आहे.