गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दोन तास चर्चा
मुंबई : अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर अदानींनी भेट घेतली असून तब्बल दोन तास बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीला महत्व मिळाले आहे.
गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला, असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. यावरुन कॉंग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले असून जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. परंतु, अदानी प्रकरणात जेपीसी गठीत करुन काहीच उपयोग नसल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. तसेच, परदेशातील कंपनी इथल्या कंपनीवर भूमिका घेते. त्याला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने चौकशी करावी, असे शरद पवार म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.