शिंदेंचा मोर्चा ज्येष्ठ नेत्यांकडे; मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या भेटीला
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांनी आता आपला मोर्चा ज्येष्ठ शिवसैनिकांकडे वळविला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केल्यानंतर अनेक शिवसैनिक त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज लिलाधर डाके यांची भेट घेतली. यानंतर आता मनोहर जोशी यांचीही भेट घेतली आहे. हे दोघेही बाळासाहेब ठाकरेंपासूनचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यामुळे राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोहर जोशींसोबत सदिच्छा भेट होती. मनोहर जोशी ज्येष्ठ नेते तसेच माजी मुख्यमंत्री राहीले आहेत. त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम झाली. मधल्या काळात जोशींची तब्येत चांगली नव्हती म्हणून सदिच्छा भेट घेतली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेना वाढवण्याचं काम केलं. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मार्गदर्शक ठरेल. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही योजना जाहीर केल्या होत्या. त्याचं पुस्तक त्यांनी मला दिलं. आम्हाला महाराष्ट्रासाठी चांगलं काम करायचं आहे. सरकारी योजना आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यांनी 60 योजना घोषित केल्या होत्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं. त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन पुरं आहे, असे त्यांनी सांगितले. ही राजकीय भेट नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट केले आहे.
शिंदे गटाने याआधीच निवडणूक आयोगाकडे धाव घेत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखल केला होता. यावर निवडणुक आयोगाने दखल घेत उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. यावर शिवसेनेकडून शिवसैनिकांकडून निष्ठापत्र घेण्यात येत आहे. तर, एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. याचे प्रमुख कारण जुन्या नेत्यांना आपल्या बाजूने करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याच्या चर्चा आहेत.