मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री अयोध्येत, रामलल्लाचं घेणार दर्शन
अयोध्या : राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर आहेत. याच अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेतील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपचे काही आमदार देखील आहेत. ते रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयु तीरावर आरती करणार आहेत. याची जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबई, नाशिक आणि ठाण्यातून शिवसैनिक अयोध्येत दाखल होत आहेत. या शिवसैनिकांच्या स्वागतासाठी खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्वतः रेल्वे स्थानकात हजेरी लावली होती. गेल्या तीनही अयोध्या दौऱ्यांपेक्षा हा दौरा मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो, असे या शिवसैनिकांचा म्हणणं आहे.
दरम्यान, लखनऊ विमानतळावर पोहचताच मुख्यमंत्री शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केला. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री झाल्यानंतर आज प्रथमच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या भूमित आलो आहे. येथे दोन तीन दिवसांपासून उत्साह आहे. येथे रामभक्तांनी संपूर्ण भगवे, हिंदुत्वाचे वातावरण केले आहे. या प्रभू रामचंद्राच्या भूमिवर मी नतमस्तक होतो, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या होत्या.