उपमुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी गणराय विराजमान; फडणवीसांनी घातले 'हे' साकडे
मुंबई : कोरोना काळानंतर दोन वर्षांनी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजारा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देश व राज्य प्रगतीपथावर जावे, असे साकडे फडणवीसांनी गणरायाला घातले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यादरम्यान फडणवीसांचे कुटुंबिय उपस्थित होते. यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हणाले की, सर्व गणेशभक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. देश व राज्यासमोरचे सर्व विघ्न दुर व्हावे, अशी मी विघ्नहर्ताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना सुख, समाधान, ऐश्वर्य मिळावे. व स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देश व राज्य प्रगतीपथावर जावे, असे साकडे फडणवीसांनी गणरायाला घातले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत. राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा, असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, मंदावलेली विकासाची गती पुन्हा वाढवायची आहे. कितीही संकटं येऊ द्या, त्याची चिंता करायची नाही. तशी हिंमत बाळगुया. पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचेही आवाहन शिंदेनी केले आहे.