पहाटेचा शपथविधीबाबत उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईलच : फडणवीस
लोणी : हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आज सकाळी सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री असे फलक लागल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पद्धत आहे, त्यामुळे ते तसे सांगतात. उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे कुणाला वाटले तरी होते का, राजकारणात काहीही होत असते. त्यामुळे ज्याला ज्याला जे-जे भावी वाटत असेल, त्याला त्यासाठी शुभेच्छा आहेत.
पोटनिवडणुकीत प्रचाराला जात असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले की, सर्वच पोटनिवडणुकांमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले आहेत. आता यंदाच्या पोटनिवडणुकीत स्वत: शरद पवार गेले आहेत. यापूर्वीच्या कोणत्याही पोटनिवडणुकीत ते गेले नाही. त्यांना काही ना काही वाटत असेल म्हणून तर स्वत: पवार साहेब जात आहेत ना? आणि तशीही निवडणुकीत मतदारांना भेटताना लाज कशाची, असेही त्यांनी म्हंटले आहे.