भरपूर बँक बॅलन्स आहे, तो पैसा ठेवून उपभोगण्यासाठी बीएमसी नाही : फडणवीस
मुंबई : मुंबईच्या कायापालटाचा तिसरा टप्पा व तिसरे भूमिपूजन आज होतेय. ३२० कामांचे भूमिपूजन आज होतेय. मुंबईत परिवर्तन झाले पाहिजे. भरपूर बँक बॅलन्स आहे. तो पैसा ठेवून उपभोगण्यासाठी महापालिका नाही. जनतेचा पैसा जनतेच्या कामांसाठी लावा असे सांगितले, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विविध सौंदर्यीकरण प्रकल्प व रस्त्यांच्या सीमेंट-काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
वर्षानुवर्षे मुंबईसारख्या शहरात दर पावसाळ्यात व नंतर ३ ते ४ महिने प्रत्येक माध्यमातून रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा असते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतका महापालिकेकडे पैसा आहे पण, तसा विचार होत नव्हता. तेच खड्डे बुजवायचे, डांबर टाकायचे. वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर पैसे खर्च करायचे आणि जनतेला खड्ड्यात टाकायचे. ही निती समाप्त करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सगळे रस्ते काँक्रीटचे करायचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयामध्ये वळून पाहायचे नाही. लोकांना खड्डेमुक्त रस्ते द्यायचे. दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई पाहायला मिळाले, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २ वर्षात हे होऊ शकते. मग २५ वर्षात का झाले नाही? काहींना बँकेतील पैशांचा सवाल आहे. पैसे बँकेत ठेवून मूल्य कमी होतेय. पण, यांना ज्या प्रकल्पात माल मिळतो ते सुरुच ठेवायचे आहेत. म्हणून पैसा बँकेत ठेवला आहे, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे. काही जणांनी मीच केले बोलायची सवय असते. नोकरी लागली माझ्यामुळे, लग्न झाले माझ्यामुळेच, मुलगा झाला तरी माझ्यामुळेच, असा टोलाही फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.
मुंबईकरांची क्षमा मागतो. एकाच वेळी अनेक कामे सुरु केल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पण, आम्हाला व्यक्ती नाही, तर काम महत्त्वाचे आहे. महापालिका आयुक्त व अधिकारी आणि कर्मचारी चांगले काम करत आहेत. चुकीचे काम केले तर सोडणार नाही. आपले सरकार चांगले काम करत आहे. केल्यावरच बोलत आहोत करून दाखवले, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.