सभागृहात आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा; फडणवीस म्हणाले, आम्ही जबाबदारी घेऊ
मुंबई : विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेहमीच जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. परंतु, सध्या विधानसभेत वेगळीच चर्चा रंगली आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची. विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय निघाला आणि एकच हशा पिकला. सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी एका प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
कामगारांचा प्रश्न मांडत आमदार बच्चू कडून म्हणाले, राज्यभरात २५ ते ३० टक्के प्रकल्प बाद होतात. त्यामुळे कामगार रस्त्यावर येतात. कामगार आहे म्हणून लग्न केलं, आता लग्न तुटलं कोण जबाबदार आहे याला? सरकारने जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी म्हंटले आहे.
याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत जोरदार फटकेबाजी केली. लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची आहे, तुटलं तर त्याला सांभाळण्याचीही जबाबदारी सरकारची आहे. आपण जी सूचना केली आहे ती जरूर तपासून पाहू. त्यासंदर्भात धोरण तयार करता येईल का आपण पाहू.
तसेच, बच्चू कडूंनी प्रश्न आदित्य ठाकरेंकडे पाहून विचारला होता का, असा चिमटाही फडणवीसांनी यावेळी काढला. सरकार लग्न लावायची जबाबदारी घ्यायला तयार आहे. तर, कुणाचेही तोंड बंद कसे करायचे याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न. मी अनुभवावरूनच बोलतो आहे, असे फडणवीसांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनीही उत्तर दिले आहे. ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का? लग्न लावून देऊ किंवा आमच्यासोबत बसा, असे त्यांनी म्हंटले आहे.